March 31, 2020
Ajab Samachar

जलजागृती सप्ताह कार्यक्रम संपन्न…..

कोल्हापूर (प्रतिनिधी):-  पाण्यासाठी व्यापक जनजागृती होणे गरजेचे आहे. पाणी हे जीवन असून ते अमुल्य आहे. त्यामुळे प्रत्येकाने पाणी काटकसरीने वापरावे असे प्रतिपादन आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केले. केशवराव भोसले नाटयगृहात आयोजित करण्यात आलेल्या जनजागृती सप्ताहाच्या समारोपाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. 
  महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग व कोल्हापूर महापालिकेच्या वतीने 16 ते 22 मार्च या कालावधीत जलजागृती सप्ताह साजरा करण्यात आला. या सप्ताहाचा समारोप आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत केशवराव भोसले नाटयगृहात पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी व कोल्हापूर पाटबंधारे मंडळाचे अधिक्षक अभियंता आर एम संकपाळ यांच्या हस्ते जिल्हयातील नदीमधील संकलित केलेले कलशाचे जलपूजन व दिपप्रज्वलन करुन करण्यात आले. 
    प्रास्ताविकात कोल्हापूर पाटबंधारे मंडळाचे अधिक्षक अभियंता आर एम संकपाळ यांनी बोलताना महाराष्ट्र शासनाच्या निर्देशासानुसार सन 2016 सालापासून जलजागृती दिन साजरा केला जातो. यंदाचे हे 4 वर्षे आहे. पाणी रियूज करुन भावी पिढीला पाणी कसे पुरेल याबाबत आत्ताच नियोजन करावे लागेल. जलसंपदा विभागाच्यावतीने जिल्हयामध्ये 60 गावे 12 तालुके याठिकाणी जलजागृती सप्ताह साजरा केला आहे. आज या कार्यक्रमाचा सांगता समारंभ आहे. शालेय विद्यार्थ्यांमध्ये पाण्याबाबत जनजागृती केलीतर येणाऱ्या काळात त्याचा उपयोग होईल. जलसंपदा विभागाने व कोल्हापूर महानगरपालिकेने एकत्र मिळून कामे हाती घेतल्यास शहराचा विकास होईल असे सांगितले. यानंतर सर्वांनी उभे राहून जलप्रतिज्ञा घेतली. 
आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी बोलताना 22 मार्च हा दिन जलदिन म्हणून मोठया प्रमाणात साजरा केला जातो. या दिनोच औचित्य साधून समाजात जल साक्षरता करण्याची गरज असल्याने व्यापक जागृतीसाठी समाजात विविध उपक्रम राबविणे गरजेचे आहे. पाण्याचे योग्य नियोजन करणे हे काळाची गरज आहे त्यासाठी प्रत्येकाने पाण्याचा एकही थेंब वाया जावू न देता पाण्यासाठी काटकसरीने नियोजन करावे असे सांगितले. शेतीसाठी मोठया प्रमाणात पाण्याचा वापर केला जातो. यासाठी जलसाक्षरता महत्वाची आहे. जलसाक्षरता व्हावी म्हणून शालेस स्तरावरील जनजागृतीला सुरवात केली आहे. पाणी स्वच्छता आणि आरोग्य याचा घनिष्ठ संबंध आहे. पाणी शुध्द असल्यास 70 टक्कयाहुन अधिका आजार नियंत्रणात येतात. यापुढेही समाजात जलसाक्षरता करणेसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असलेचे आयुक्तांनी सांगितले. 
    कारभारवाडीचे ठिबक सिंचन योजना पुरस्कर्ते प्रा.नेताजी पाटील यांनी बोलताना कारभारवाडीत पाणी मुबलक असताना स्किम बंद पडत आली होती. ग्रामस्थांच्या सांगण्यावरुन आपण 2014 मध्ये ही स्किम आपल्या ताब्यात घेतली. त्यानंतर ठिबक सिंचन करण्याचे ठरविले. 131 शेतकऱ्यांना सोबत घेऊन हे करणे सोपं नंव्हत तरीही मार्च 2015 मध्ये संपूर्ण गांव ठिबक सिचंन केलं. पाण्याचा योग्य वापर झाल्याने आणि उत्पादन चांगले मिळाल्याने कारभारवाडीतील शेतकरी शेती परवडत नाही अस कधीच म्हणत नाहीत. सध्या उसाचे सरासरी उत्पादन हे 43 टन आहे. यापुर्वी 27 टन सरासरी ऊस उत्पादन शेतकरी घेत होते. मात्र सर्व शेती ठिबक सिंचनाखाली आणल्याने सरासरी उत्पादनात 16 टनाची वाढ होऊन 43  टन ऊसाचे उत्पादन शेतकरी घेऊ लागलेत. यामुळे 26 हजारांचा नफा शेतकऱ्यांना मिळत आहे. त्याचबरोबर सहकारी तत्तवावरील भाजीपाला केंद्र करवीरमध्ये प्रथम सुरु केले. आगामी काळात कारभारवाडी हे गाव शेतीमाल निर्यातीत अग्रेसर ठरेल असे सांगितले. 
यावेळी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर, अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, उपआयुक्त मंगेश शिंदे, आरोग्याधिकारी डॉ.दिलीप पाटील, प्रशासन अधिकारी शंकर यादव, नगरसचिव दिवाकर कारंडे, मुख्य आरोग्य निरिक्षक डॉ.विजय पाटील, पर्यावरण प्रेमी उदय गायकवाड व जलसंपदा व महापालिकेचे सर्व अभियंता, कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. 

Leave a Comment