July 11, 2020
Ajab Samachar

९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाची कार्यक्रम पत्रिका जाहीर….

मुंबई (प्रतिनिधी) :- २२ फेब्रुवारीला नागपूरमध्ये ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे मोठ्या थाटामाटात उदघाटन होणार आहे. ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाची उत्सुकता आता शिगेला पोहचली असून २२ फेब्रुवारीला दुपारी ३ वाजता नागपूर शहरात वाजत गाजत नाट्य दिंडीने संमेलनाची सुरवात होणार आहे. नंतर संध्याकाळी ९९ व्या नाट्य संमेलनाचे उदघाटन ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार ह्यांच्या हस्ते होणार आहे. ह्यावेळी मंचावर, ९९ व्या नाट्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रमुख पाहुणे, स्वागताध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि नाट्यपरिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी असणार आहेत. २२ फेब्रुवारी पासून २५ फेब्रुवारी पहाटे पर्यंत नागपूरच्या नाट्य नगरीत सलग कार्यक्रम होणार आहेत. 

अभिनेता भरत जाधव ह्यांच्या अफलातून अभिनयाने गाजलेलं पुन्हा सही रे सही हे व्यावसायिक नाटक ९९ व्या नागपूर नाट्य संमेलनाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे . तसेच आनंदवन येथिल विकास आमटे ह्यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या स्वरावनंदन ह्या संगीतमय कार्यक्रमाने २५ फेब्रुवारीला पहाटे नाट्यसंमेलनाचे सूप वाजणार आहे. ज्येष्ठ गायिका देवकी पंडित ह्यांच्या सुफी गीतांवर आधारित मुक्ती ह्या संगीतमय कार्यक्रमाची पर्वणीही नागपूरकरांना अनुभवायला मिळणार आहे . त्याचसोबत विदर्भातील गाजलेल्या झाडेपट्टी रंगभूमीवरील अस्सल नाटकाचा आस्वादही घेता येणार आहे . तसेच विदर्भातील महाविद्यालयीन तरुणांच्या गाजलेल्या एकांकिकाही संमेलनात सादर होणार आहेत . तसेच प्रेमानंद गजवी ह्यांची प्रकट मुलाखतही होणार आहे . 
९९ व्या नाट्यसंमेलनात अनेक दिग्गज नाट्यकर्मींचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे . ज्येष्ठ नाट्यकर्मी , दिग्दर्शक आणि नुकताच पद्मश्री हा मानाचा पुरस्कार जाहीर झालेले वामन केंद्रे आणि नुकत्याच संपन्न झालेल्या संगीत नाटक अकादमी पुरस्कार सोहळ्यात विशेष पुरस्कार मिळवलेले लेखक अभिराम भडकमकर आणि लोककला अभ्यासक प्रकाश खांडगे ह्यांचा सन्मान करण्यात येणार आहे .

Leave a Comment