July 11, 2020
Ajab Samachar

विवाहपूर्व समुपदेशनाकडे वाढतोय तरुणाईचा कल

पुणे – विवाह जुळवून आणण्यासाठी पूर्वी केवळ कुटुंबाची भूमिका महत्त्वाची असायची. आता मात्र मुला-मुलींची मानसिकता, नोकरी, पगार हे सगळेच लक्षात घेतले जाते. तरीही अनेक विवाह अयशस्वी तर काहींमध्ये तणाव निर्माण होताना दिसत आहेत. यातूनच विवाहपूर्व समुपदेशनाकडे तरुणाईचा कल वाढला असल्याचे ‘सकाळ’ने केलेल्या निरीक्षणात आढळले आहे.

लग्न ठरल्यानंतर आपल्यातील शारीरिक दोषावर योग्य उपचार घेण्याऐवजी झटपट उपचाराने तो कसा लपविता येईल, यासाठी अनेकजण प्रयत्न करतात. त्याचे दुष्परिणाम आयुष्यभर भोगावे लागतात. शिवाय विवाहपूर्व काही वैद्यकीय चाचण्या करून घेणेही महत्त्वाचे असते. त्यासाठी एचबी इलेक्‍ट्रो फोरेसिस ही चाचणी महत्त्वाची आहे. यातून ‘थॅलेसिमिया’ आणि ‘सिकलसेल’ यांची स्थिती समजते. थॅलेसिमियामध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण हे सामान्य माणसांपेक्षा वेगळे असते. हे प्रमाण एकात असेल तर काही हरकत नाही; पण दोघांमध्ये असल्यास लग्न न करण्याचा सल्ला डॉक्‍टर देतात. याचे मुख्य कारण म्हणजे त्यांच्या अपत्याचे रक्त आयुष्यभर बदलत राहावे लागेल.

मुलींना लग्नात आपल्या त्वचेचा रंग उजळलेला पाहिजे असतो; पण त्वचेचा मूळ रंग बदलविण्याच्या उपचारपद्धती आर्थिकदृष्ट्या तर महागात पडतातच; पण त्यामुळे त्वचेचा पोत कायमचा घसरू शकतो. याबाबतही डॉक्‍टरांचा सल्ला महत्त्वाचा ठरतो.

Leave a Comment